MumbaiNewsUpdate : समीर वानखेडे यांचा शाळेचा दाखला झाला उघड

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवीन आरोप करताना राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जातीचा स्पष्ट उल्लेख असलेला दाखल जारी केला असल्याने त्यांची धार्मिक ओळख मुस्लिमच असल्याचे स्पष्ट होत आहे. मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याकडे लक्ष वेधले असून ही कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच केलेली असून आर्यन खान प्रकरण वानखेडे यांनी केवळ खंडणीसाठी रचल्याचा आरोप केलेला आहे. त्याशिवाय वानखेडे यांच्यासह त्यांच्या कंपूनं बड्या घरातील लोकांना अनेक खोट्या प्रकरणांमध्ये अडकवल्याचेही मलिक यांनी म्हटले होते. त्यांनी वैयक्तिक आयुष्यातही अनेक घोटाळे केल्याचा मलिक यांचा दावा आहे. खोटे जात प्रमाणपत्र दाखवून त्यांनी सरकारी नोकरी मिळवली असून ते धर्मानं मुस्लिम आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव ‘दाऊद’ आहे, असा दावा मलिक यांनी केला होता. मलिक यांच्या आरोपानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तसंच, मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटींचा बदनामीचा दावा दाखल केला आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने दोन्ही बाजूंना आपापले म्हणणे सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मलिक यांनी वानखेडे यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयीची कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत.
मलिक यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. समीर वानखेडे यांचा सेंट पॉल शाळेचा दाखलाही त्यांनी न्यायालयाला दिला आहे. त्यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद असं असून धर्म ‘मुस्लिम’ अशी नोंद आहे. त्यावरून मलिक यांनी वानखेडेंवर निशाणा साधला आहे. या आधीही मलिक यांनी वानखेडे यांचा एक जन्मदाखला सोशल मीडियात शेअर केला होता. मात्र, तो खोटा असल्याचं वानखेडे यांनी म्हटले होते . क्रांती रेडकर यांनीही काल एक जन्मदाखला प्रसिद्ध केला होता. त्याबाबत विचारलं असता मलिक यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला. वानखेडे हे बनावट नोटांचे खेळाडू आहेत. त्यामुळं नकली कागदपत्रे कशी बनवायची हे त्यांना चांगलं माहीत आहे. पण हा खेळ फार काळ चालणार नाही,’ असे मलिक यांनी म्हटले आहे.