AurangabadCrimeUpdate : अखेर प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाला वाचा फुटली !!

औरंगाबाद : अखेर आठवडाभराच्या अखंड परिश्रमानंतर औरंगाबाद शहरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाला वाचा फोडण्यात यश मिळाले असून या प्रकरणातील संशयित आरोपी विधिसंघर्ष बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणात तपास करीत असताना संशयित आरोपीने कबुली दिल्यानंतर पुरावे मिळवणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते.
पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी या बाबत माहिती देताना सांगितले कि , हा तपास सुरु असताना आज सकाळी डॉ. शिंदे यांच्या घराच्या जवळच असलेल्या विहिरीतून खुनासाठी वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांना सापडले. यात व्यायामाचा एक डंबेल्स, स्वयंपाक घरातील चाकू याचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार डॉ. राजन यांच्या डोक्यात संशयित आरोपीने डंबेल्स मारले आणि त्यानंतर चाकूने गळा व हाताच्या नसा कापल्या आणि शिंदे गतप्राण झाले. या प्रकरणातील पुरावे सापडताच पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपी म्हणून विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आणि या खुनाचा महत्वाचा धागा पोलिसांना सापडला.
दीपक गिर्हे पुढे म्हणाले कि , प्रा. शिंदे नेहमी मारेकऱ्याला रागावत असल्याने त्यांच्यात सतत वाद होत होते. तू “ढ” आहेस असे हिनवायचे. त्यामुळे मारेकऱ्याच्या डोक्यात शिंदेंबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला होता. त्यातच हत्येच्या रात्री देखील दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यातूनच मारेकऱ्याने झोपेतच शिंदेंची निर्घृणपणे हत्या केली. शहर पोलीस दलातील टॉपचे अधिकारी या हत्येचा उलगडा करण्यात आठ दिवसांपासून जंगजंग पछाडत होते.
११ आक्टोबर रोजी मौलाना आझाद कॉलेज मधील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांचा त्यांच्या राहत्या घरात डोक्यात वार करून नंतर गळा, हाताच्या नसा कापून खून करण्यात आला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या खून प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सर्व तपास स्वतःकडे घेतला आणि विविध पथके नेमून सर्व तांत्रिक पुरावे हस्तगत करण्यात यश मिळवले . दरम्यान, एका संशियाताने दिलेल्या माहितीवरून घराच्या जवळील विहिरीत खुनासाठी वापरण्यात आलेल्या पुराव्यांचा पोलीस, महापालिका , अग्निशमन दल यांची मदत घेऊन तपास करीत होते.
अखेर विहिरीतील पाणी आणि गाळ काढल्यानंतर तीन दिवसांनी आज सकाळी खुनासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे सापडली. यात व्यायामासाठी वापरायचे अंदाजे ५ किलोचे डंबेल, एक धारदार चाकू आणि रक्त पुसलेले टॉवेल याचा समावेश आहे. सर्व शस्त्र सापडताच पोलिसांनी तत्काळ विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक करून करून त्याला बाल न्याय मंडळात हजर करण्यात येणार आहे.
तो हिटलर होता, म्हणून संपविला एकदाचा
दरम्यान पोलिसांकडून तपास चालू असताना , घटनेच्या पाचव्या दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी खुनाबद्दल पोलिसांकडे पहिल्यांदाच कबुली दिली. त्यावरून मुख्य संशयिताची चौकशी करण्यात आली. त्यानेही खून केल्याचे कबूल करून त्यासाठी वापरलेले शस्त्र सिडको एन २ येथील महापालिकेच्या जागेतील विहिरीत टाकल्याचे सांगितले. तो हिटलर होता, म्हणून संपविला एकदाचा असे संशयिताने पोलिसांना सांगून अखेर खुनाची कबुली दिली त्यानंतर पोलीस पुरावे शोधण्यासाठी सक्रिय झाले होते त्याला अखेर यश मिळाले. आणि या तपासावर पडदा पडला.
पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, गीता बागवडे, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक दत्ता शेळके, मनोज शिंदे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तपास केला.