IndiaNewsUpdate : मुलीचे आंतरधर्मीय प्रेम मान्य नसल्याने प्रियकर तरुणाचा काढला काटा , १० जणांना अटक

बंगळुरू : बेळगावच्या रेल्वे ट्रॅकवर एका २४ वर्षीय अभियंता तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. हा तरुण गेल्या महिन्यात २८ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला होता . दरम्यान आंतरधर्मीय संबंध पसंत नसल्याने प्रेयसीच्या आई-वडिलांकडून तरुणाची सुपारी देऊन हत्या घडवून आणण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून या प्रकरणात १० जणांना अटक करण्यात आली आहे. मृत तरुणाचे नाव अरबाज आफताब मुल्ला असे आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी कि , बेळगावच्या रेल्वे ट्रॅकवर छिन्नविछिन्न अवस्थेत बेपत्ता तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. पोलीस चौकशीत हे आत्महत्येचे प्रकरण नसून हत्या प्रकरण असल्याचे धागेदोरे समोर आले. अरबाज आफताब मुल्ला याच्या हत्या प्रकरणात त्याच्या प्रेयसीच्या आई-वडिलांसहीत १० जणांना अटक करण्यात आली आहे. मुस्लीम तरुणासोबतचे आपल्या मुलीचे प्रेमसंबंध आरोपी माता-पित्याला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी अरबाजच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती प्लॉईस तपासात उघड झाली.
पुंडलिका महाराज (३९ वर्ष), कुथाबद्धीन अल्लाहबख्श (३६ वर्ष), सुशीला ईरप्पा (४२ वर्ष), मारुती प्रल्हाद (३० वर्ष), मंजुनाथ तुकाराम (२५ वर्ष), गणपती ज्ञानेश्वर (२७ वर्ष), ईरप्पा बसवन्नी कुंभार (५४ वर्ष), प्रशांत कलप्पा (२८ वर्ष), प्रवीण शंकर (२८ वर्ष) आणि श्रीधर महादेव डोनी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
मुलाच्या आईने व्यक्त केला होता संशय
मयत अरबाजची आई नजमा शेख यांनी त्यांच्या मुलाचे हिंदू मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याने अरबाजची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास केला असता , पोलीस तपासात अरबाजच्या प्रेयसीचे वडील ईरप्पा आणि आई सुशीला ईरप्पा यांनी अरबाजला मारण्याची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले. मुख्य आरोपी पुंडलिका याने एक टीम तयार करून अरबाजची हत्या केली आणि त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला असे पोलिसांनी सांगितले.
बेळगावच्या आझम नगरचा रहिवासी असलेला अरबाज सिव्हिल इंजिनिअरिंगचा पदवीधर होता. बेळगावमध्ये तो कार डीलर म्हणून काम करत होता. २८ सप्टेंबर रोजी रेल्वे ट्रॅकवर अरबाजचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अप्राकृतिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. शवविच्छेदन अहवालात डोक्यात सुरा घुपसल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांचा संशय खरा ठरला. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली. या प्रकरणात १० जणांना अटक करण्यात आली आहे .