MaharashtraNewsUpdate : तरुणांनो लागा तयारीला , राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई : कोरोनामुळे या परीक्षा लांबणीवर पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२१ व मुख्य परीक्षेच्या तारखा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केल्या आहेत. २९० पदांसाठी १७ संवर्गात राज्य लोकसेवा आयोगाकडून भरती केली जाणार आहे. याबाबतची विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आयोगाने ट्विटद्वारे याची माहिती दिली असून, त्यानुसार २ जानेवारी २०२२ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. https://t.co/XnX063nev0
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 4, 2021
पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे २०२२ रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.
या परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांना उद्या (५ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजेपासून अर्ज करता येणार आहे. तर, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे. दरम्यान या अगोदर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरती प्रक्रियांचे अंतिम निकाल जाहीर करण्याबाबतच्या प्रचलित कार्यपद्धतीचा साकल्याने विचारून निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. या संदर्भातही आयोगाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व भरतीप्रक्रियांकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळार प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच, बहूसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पात्र उमेदवारांकडून पसंतीक्रम मागवून त्याच्या आधारे अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल. निवडप्रक्रियेसंदर्भातील उपरोक्त सुधारित कार्यपद्धती सन २०२० व त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातींच्या प्रलंबित निकाल प्रक्रियेपासून लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.