MaharashtraNewsUpdate : नितीन गडकरी यांच्या रस्ते विकासाची शरद पवार यांनी केली अशी प्रशंसा

अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याची प्रशंसा करताना गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी नमूद केले. अहमदनगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवार बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले कि , देशाच्या विकासात रस्त्यांचे महत्व मोठे असते. गडकरींनी ही जबाबदारी (रस्ते वाहतूक मंत्रालय) घेण्याच्या पूर्वी देशात ५ हजार किमीचे काम झाले होते . गडकरींकडे जबाबदारी आल्यानंतर तोच आकडा १२ हजार किमीच्या पुढे गेला आहे. दरम्यान आपल्याला रस्त्याने प्रवास करायला आवडत असल्याचे सांगून ते म्हणाले कि , देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावे लागते. गाडीने प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. कारण त्यामुळे रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातील पिके बघायला मिळते. म्हणून मी शक्यतो रस्त्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करतो.
देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात ‘ही गडकरी साहेबांची कृपा आहे’. त्यामुळे लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवले आहे. नितीन गडकरी आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम बघतात असेही शरद पवार यावेळी म्हणाले.