MaharashtraNewsUpdate : कोरोनाबरोबरच राज्यात डेंग्यू, चिकनगुनियाचीही काळजी घेण्याचे राज्याच्या मुख्य सचिवांचे आवाहन

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नविन रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यासह अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांचा आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवितानाच ठाणे जिल्ह्यात करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.
राज्याच्या मुख्य सचिवांनी आज ठाणे, पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा येथील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. ठाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर दोन टक्क्यांहून कमी आहे. मात्र या जिल्ह्याच्या लगत असलेल्या मुंबईत रुग्णसंख्या काहीशी वाढत असून ठाणे जिल्ह्याने अधिक सतर्कता बाळगावी. चाचण्यांचे प्रमाण वाढवितानाच जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आदी महापालिका क्षेत्रात देखील रुग्णसंख्या वाढणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.
दरम्यान राज्यात कोरोनासोबतच काही जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी महापालिका आणि ग्रामीण क्षेत्रात संबंधित यंत्रणांनी डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर दिला पाहिजे. डास निर्मुलन मोहिम प्रभावीपणे राबविली पाहिजे, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, अपर जिल्हाधिकारी वैदैही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे आदी उपस्थित होते.