MarathawadaNewsUpdate : रॅगिंग केल्याच्या आरोपावरून तीन मुलींसह शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल , ” हलक्या जातीची आहेस …” असे बोलून केला अवमान

नांदेड : हदगावपासून एक किलोमीटर अंतरावरील गोविंदराव पऊळ नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहात , “कपडे काढ, नाक घास, झाडू मार…” , ” तू हलक्या जातीची आहेस ” अशी अवमानास्पद भाषा वापरून एका विद्यार्थिनीला कपडे काढण्यास भाग पाडून रॅगिंग करण्याची घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी एका शिक्षकासह तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, शिक्षकाला अटक केली आहे.
मटा ऑनलाईनने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि , पीडित लीला या महाविद्यालयात प्रवेश घेऊन आठ दिवस होत नाहीत तोच हि घटना घडली. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात इतर मुलींसोबत राहत होती. दरम्यान पीडित मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार वरिष्ठ वर्गात असलेल्या तीन मुली पीडितेच्या खोलीत गेल्या व त्यांनी पीडितेला ‘आम्ही सिनियर आहोत’, असे धमकावले. तसेच ‘कपडे काढ, नाक घास, झाडू मार… असे म्हणून तिला तसे करण्यास भाग पाडले. हे सांगण्यासाठी मुलगी शिक्षक भगीरथ शिंदे याच्याकडे गेली, तेव्हा त्यानेही तिचा विनयभंग करून, ‘तू हलक्या जातीची आहेस, तुझे शैक्षणिक नुकसान करतो’, असे म्हणून तिला धमकावल्याचा आरोप आहे. मुलीने घडलेला प्रकार वडिलांना कळवला.
दरम्यान सकाळी पीडित मुलीचे वडील महाविद्यालयात आले आणि त्यांनी तिचा प्रवेश रद्द करून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी भगीरथसह त्या तीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल करून शिक्षक असलेल्या भगीरथला अटक केली. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड तपास करीत आहेत. उपविभागीय अधिकारी जी. जी. रांजणकर तपास करीत आहेत.