CoronaIndiaUpdate : सावधान : देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्ये होते आहे वाढ

नवी दिली : गेल्या २४ तासांत ४५,३५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३६६ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे. दरम्यान उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ९९ हजार ७७८ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १.२२ टक्के इतकी नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या १०१९५ ने वाढली आहे.
देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी २९ लाख ३ हजार २८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ३९ हजार ८९५ झाली आहे, तर मृत्युदर १.३४ टक्के नोंदला गेला आहे. करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.४८ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. आतापर्यंत ३ कोटी २० लाख ६३ हजार ६१६ जण करोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी १६ लाख ६६ हजार ३३४ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ५२ कोटी ६५ लाख ३५ हजार ६८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दैनंदिन रुग्णवाढीचा दर २.७२ टक्के नोंदला गेला आहे, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २.६६ टक्के इतका नोंदला आहे. गेल्या ७० दिवसांपासून रुग्णवाढीचा दर ३ टक्क्यांपेक्षा कमी नोंदला गेला आहे.
युरोपमध्ये चिंताजनक स्थिती
युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळणार आहे. डिसेंबरपर्यंत २ लाखांहून अधिक लोकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात येत आहे.जागतिक आरोग्य संघटनेने ही भीती व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने युरोपियन देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी १ डिसेंबरपर्यंत युरोपमध्ये सुमारे २ लाख ३६ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली आहे. यावेळी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने कहर केला असून रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. युरोपमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १.३ मिलियन लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे तीन कारण असल्याचं म्हटलं जात आहे. उच्च ट्रान्समिशन दर, लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि निर्बंधांमध्ये दिलेली सूट याचा यामध्ये समावेश आहे.