MumbaiNewsUpdate : राज्यात उद्यापासून तीन दिवस जोरदार पाऊस

मुंबई : राज्याच्या हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात उद्यापासून तीन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्यापासून म्हणजेच ४ ते ६ सप्टेंबर या दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार आहे.आज बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावतीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान येत्या ५ सप्टेंबरसाठी हवामान विभागानं पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर ६ सप्टेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या शिवाय हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन चार दिवसांत राज्यात मान्सून दिमाखात आगमन करेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवसात बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी मान्सूनची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.