MumbaiNewsUpdate : निवृत्त न्यायाधीश भास्कर शेट्ये यांचे निधन

मुंबई : विधानमंडळाचे निवृत्त सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये यांचे आज दुपारी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. भास्कर शेट्ये यांचे शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर त्यांनी वकिलीची पदवी घेतली. काही काळ वकिली केल्यानंतर त्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली. सांगली, पुणे, नाशिक, राधानगरी, कोल्हापूर, धुळे, चाळीसगाव, पालघर, पणजी आदी ठिकाणी त्यांनी न्यायाधीश म्हणून अनेक वर्षे काम केले होते. त्यांच्या कामाची दखल घेन त्यांची महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव म्हणून निवड झाली. विधानसभा सचिव म्हणून त्यांनी दहा वर्षे कामकाज पाहिले.
विधानसभा सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नव्यानेच निर्माण झालेल्या महाराष्ट्र-गोव्याचे बँकिंग लोकपाल म्हणून निवड झाली. तेथे त्यांनी तीन वर्षे काम पाहिले. निवृत्तीनंतर त्यांचे रत्नागिरीत वास्तव्य होते. भास्कर शेट्ये गगनगिरी महाराजांचे निःस्सीम भक्त होते. त्यांना महाराजांचा अनेक वर्षे जवळून सहवास लाभला होता. निवृत्तीनंतर त्यांनी विविध सामाजिक संस्थांमध्ये काम केले होते. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-सदस्य म्हणून ते अनेक वर्षे काम करीत होते.
भास्कर शेट्ये हे विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांमध्ये कार्यरत होते. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक सदस्य म्हणून ते अनेक वर्षे काम करीत होते. भास्कर शेट्ये यांना नाट्य अभिनायाची आवड होती. त्यांनी पटवर्धन हायस्कूल, गोगटे कॉलेज, मुंबईचे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण चालू असताना नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरीत काही वर्षांपूर्वी झालेल्या नाट्यसंमेलनाच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. हे पद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले. ते शिस्तप्रिय व वक्तशीर म्हणून प्रसिद्ध होते. मुंबईतील प्रसिद्ध लाड फाऊंडेशनच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.