MaharashtraRainUpdate : मराठवाडय़ासह नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागाला अक्षरशः झोडपले !!

औरंगाबाद : काही दिवसांच्या विरामानंतर मंगळवारी पावसाने मराठवाडय़ासह नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागाला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे आलेल्या पुरात सात नागरिकांसह शेकडो जनावरे वाहून गेली. अतिवृष्टीमुळे शेतीचेही नुकसान झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड तालुक्यात औट्रम घाटात दरडी कोसळल्याने औरंगाबाद-धुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल १६ तास ठप्प होती. गौताळा अभयारण्यातही दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान काही गावांमध्ये पाझर तलाव फुटल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले. मराठवाडय़ात ६७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
पुरात वाहून गेले…
कंधार तालुक्यातील मौजे, गगनबीड येथे उमेश रामराव मदेबैनवाड हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. लोहा तालुक्यातील सावरगाव येथे ढगफुटी झाल्याने मनकर्णाबाई बाबुराव दगडगावे, पार्वतीबाई संभाजी दगडगावे या दोघी वाहून गेल्या. गेवराई तालुक्यातील अमृता धर्मराज कोरडे, नेहा धर्मराज क ोरडे हे आठ वर्षांचे बहीण- भाऊ गोदावरी पात्रात वाहून गेले. तसेच वडवणी तालुक्यातील पिंपळनेर येथील मयूर विश्वनाथ थोरात हा २२ वर्षांचा तरुण वाहून गेल्याचे वृत्त आहे.
नगर जिल्ह्यातही मोठे नुकसान
पावसाने सोमवारी रात्रीपासून नगर जिल्ह्यालाही झोडपले. ढगफुटीने पाथर्डी, शेवगाव व नगर तालुक्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. या तिन्ही तालुक्यांतील अनेक नागरी वस्त्यांना पुराचा वेढा होता. जनावरे आणि घरासमोर लावलेली वाहने वाहून गेली. व्यावसायिकांसह शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काही ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले. या पथकाने सुमारे ३० जणांना पुराच्या पाण्यातून वाचवले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील १२ गावांतील दीड हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रात ढगफुटीसदृश पाऊस
उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने जळगावमधील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. गिरणा, तितूर, डोंगरी या नद्यांसह नाल्यांना पूर आल्याने चाळीसगावसह नदीकाठावरील सहापेक्षा अधिक गावांमध्ये पाणी शिरले. पुरामुळे शंभरपेक्षा अधिक जनावरे वाहून गेल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. एका महिलेचा पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. दरड कोसळल्यामुळे बंद झालेली कन्नड घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुपारनंतर काम सुरु करण्यात आले.
दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. मुंबई, कोकणासह मराठवाडय़ात बुधवारी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.