KaunBanegaKarorpatiUpdate : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधीचा ७ कोटींचा प्रश्न , ज्याचे उत्तर या शिक्षिकेला आले नाही !!

मुंबई : सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ च्या १३ व्या पर्वामध्ये दुसऱ्याच आठवड्यामध्ये पहिली करोडपती होण्याचा मान हिमानी बुंदेल यांनी मिळवला असला तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे हिमानीला सात कोटीवर पाणी सोडावे लागले. दरम्यान आपण एक कोटी जिंकल्यावर विश्वासच बसत नसल्याचे हिमानी यांनी म्हटले आहे.
हिमानीचा २०११ साली एक भीषण अपघात झाला. यामध्ये तिची दृष्टी गेली. मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर या २५ वर्षीय तरुणीने आपलं शिक्षण पुन्हा सुरु केले आणि आता ती एका शाळेत शिक्षिका आहे. या पैशांमधून दिव्यांग व्यक्तींसाठी तिला काम करायचं असून करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये वडिलांचा रोजगार केल्याने त्यांनाही एखादा उद्योगधंदा सुरु करण्यासाठी मदत करण्याची तिची इच्छा आहे.
एक कोटीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न असा होता…
एक कोटींसाठी हिमानी यांना दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्समध्ये ब्रिटनची हेर म्हणून काम करताना नूर इनायत खान हीने कोणतं टोपणनाव वापरलं होतं?, असा प्रश्न विचारण्यात आलेला. या प्रश्नाला
A) वेरा एटकिस
B) क्रिस्टीना स्कारबेक
C) जुलीएन आईस्त्रर
D) जीन-मेरी रेनियर
असे चार पर्याय देण्यात आले होते. हिमानी यांनी बराच वेळ घेत कोणत्याही लाइफलाईनची मदत न घेता डी असं उत्तर दिलं. जे बरोबर आलं आणि त्या या सिझनच्या पहिल्या करोडपती ठरल्या. हिमानीला ह्युंदाईची ऑरा ही कारही भेट देण्यात आली. या गाडीची किमान किंमत पाच लाख ९७ हजार इतकी आहे.
सात कोटींसाठीचा प्रश्न असा होता ….
दरम्यान एक कोटोसाठी असलेला प्रश्न जिंकल्यानंतर सात कोटींसाठी हिमानी यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. बराच वेळ विचार केल्यानंतर एक कोटींवरुन थेट तीन लाख २० हजारांवर येण्याऐवजी त्यांनी शो क्वीट करण्याचा निर्णय हिमानी यांनी घेतला.
सात कोटींसाठी हिमानी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचं शीर्षक काय होतं ज्यासाठी त्यांना १९२३ साली डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली?, असा प्रश्न विचारण्यात आलेला.
A) द वॉण्ट्स अॅण्ड मीन्स ऑफ इंडिया
B) द प्रॉब्लेम ऑफ द रुपी
C) नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया
D) द लॉ अॅण्ड लॉयर्स
असे चार पर्याय देण्यात आलेले. हिमानी यांनी बराच वेळ विचार करुन आपल्याला सी पर्याय म्हणजेच नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया हे उत्तर वाटत असल्याचं सांगितलं. मात्र त्यांनी शेवटी धोका फार मोठा असल्याचं सांगत गेम क्वीट केला. या प्रश्नाचं बरोबर उत्तर बी म्हणजेच द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे होतं.
शिक्षिका असलेल्या हिमानीला सात कोटी जिंकता आले नसले तरी दृष्टीहीन असूनही हिमानी यांनी एक कोटी रुपये जिंकल्याचा आनंद होस्ट असणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासहीत सर्व उपस्थित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.