CoronaIndiaUpdate : धक्कादायक : कोरोनामुळे गेलेल्या पत्नीचा विरह सहन झाल्याने वकिलाने घातल्या स्वतःवर गोळ्या !!

होशंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट देशाच्या उंबरठ्यावर असल्याने देशात सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आतापर्यंत तब्बल चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून देशातील तीन कोटीहून अधिक लोकांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. याच मालिकेत मध्य प्रदेशातील एका वकिलाने कोरोनामुळे पत्नीचा झालेला मृत्यू सहन न झाल्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या होशंगाबादमध्ये राहणाऱ्या एका वकिलाच्या पत्नीला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र पत्नीच्या मृत्यूचा मोठा मानसिक धक्का बसल्याने वकील नैराश्यात गेले होते. त्यानंतर त्याने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आनंद दुबे असे या व्यक्तीचे नाव असून ते या भागातील लोकप्रिय वकील होते.
कोरोनामुळे झालेल्या आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आनंद खूप शोकमग्न आणि तणावात होते. त्यामुळे आनंद यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यांना एक मुलगा आहे.
कोरोनाने केली वाताहत , सहा मुले झाली अनाथ
कोरोनामुळे आणखी एक घटना मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यामध्ये अमाहा गावात घडली असून या घटनेत कोरोनाने आई-वडिलांचे छत्र हरपल्याने 6 मुले अनाथ झाली आहेत. या घटनेत कोरोनामुळे आधी वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आईला देखील जीव गमवावा लागला आहे. अवघ्या काही महिन्यांत दोघांचाही मृत्यू झाल्याने सहा मुलं आता पोरकी झाली आहेत. त्यांची सर्वात मोठी मुलगी ही सात वर्षांची आहे. तर सर्वात लहान चिमुकला अवघा आठ महिन्यांचा आहे. भावंडांचं पोट भरण्यासाठी सात वर्षीय मुलगी गावातील घराघरात जाऊन अन्न मागत आहे. पतीच्या मृत्यूनंतर मुलांची आई घर चालवत होती. पण कोरोनाने तिलाही हिरावून घेतले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पण आता नातेवाईकांनी देखील मुलांकडे पाठ फिरवली आहे.