MumbaiNewsUpdate : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हाजीर हो … !!

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले असून या नोटीसनंतर आपणास हे अपेक्षितच होते मात्र ईडीने नोटीसमध्ये कारण नमूद केलेले नाही, अशी प्रतिक्रिया अनिल परब त्यांनी दिली आहे. ईडीने अनिल परब यांना ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील कार्यालयात हजर होण्यास सांगितले आहे.
अनिल परब यांना ईडीने १०० कोटीच्या कथित वसुलीसंदर्भात हे समन्स बजावले आहे. दरम्यान अशी नोटीस मिळाल्याच्या माहितीला अनिल परब यांनीही दुजोरा दिला व माध्यमांकडे याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली. ईडीने मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्याला उत्तरही कायदेशीररित्या दिले जाईल, असे सांगत अनिल परब यांनी महत्त्वाचा दावा केला. ‘ईडीची नोटीस आज संध्याकाळी मला मिळाली. या नोटीसमध्ये सविस्तर काहीच लिहिण्यात आलेले नाही. कोणत्या प्रकरणात ही नोटीस आहे त्याचाही उल्लेख केला गेलेला नाही. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आपण आमच्या कार्यालयात हजर व्हावे इतकाच उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. त्यामुळे कशासाठी ही नोटीस आहे हे आता मलाही सांगता येणार नाही’, असे परब यांनी सांगितले.
‘असं काहीतरी होईल हे आम्हाला अपेक्षितच होते. त्यामुळे आता नोटीस आल्यावर त्याला सामोरे जावे लागेल. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर दिले जाईल. ज्यावेळी ही नोटीस नेमकी कशासाठी बजावली ते कळेल तेव्हाच त्याला उत्तर देता येईल. यावर आताच अधिक काही बोलता येणार नाही’, असेही परब यांनी पुढे नमूद केले.