WorldNewsUpdate : काबुल विमानतळावरील हल्ल्याचा भारताकडून निषेध

नवी दिल्ली : भारताने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये गुरुवारी संध्याकाळी झालेल्या तीन बॉम्बस्फोटांचा तीव्र निषेध केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांबद्दल भारताने शोक व्यक्त केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण जगाने दहशतवादाविरोधात आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणाऱ्यांविरोधात एकजूट होणे गरजेचे आहे असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारताने आयसिसबाबत जगाला सावधतेचा इशारा दिला होता. अफगाणिस्तानमध्ये अराजकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रात आयसिसचा धोका वाढला आहे, असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आधीच म्हणाले होते. काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांसोबतची बैठक रद्द केली. यानंतर त्यांनी सुरक्षा संबंधी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन, संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन, ज्वॉइंट चीफ ऑफ स्टाफ मार्क मिले यांच्यासह इतर कमांडर सहभागी होते.
दरम्यान काबुलमधील अमेरिकेच्या दुतावासाने बुधवारी संध्याकाळी नागरिकांना अलर्ट जारी केला होता. या अलर्टमध्ये त्यांनी विमानतळापासून दूर राहण्याचे आणि विमानतळाकडे जाणे टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. तसेच विमानतळाच्या गेटवर असलेल्या नागरिकांना तात्काळ हटविण्यात यावे असे आवाहन अमेरिकेने नागरिकांना केले होते. याशिवाय ऑस्ट्रेलियानेही आपल्या नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याची सूचना केली होती. ब्रिटनचे मंत्री जेम्स हॅपी यांनीही हल्ल्याची शक्यता वर्तवली होती.