Corona News Update : सावधान : नीती आयोगाचा तिसऱ्या लाटेचा इशारा , दैनंदिन ४ ते ५ लाख रुग्णांचा अंदाज

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरून आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत असताना आता निती आयोगाने तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यामुळे चिंता वाढली आहे. निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सरकारला याबाबत महत्त्वाची आकडेवारी सादर केली असून देशातील नागरिकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचनादेखील केल्या आहेत.
तिसऱ्या लाटेबाबतच्या या अहवालात अनेक शिफारसीदेखील करण्यात आल्या असून देशाला भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागेल, असा इशारादेखील देण्यात आला आहे. तिसरी लाट जेव्हा टोक गाठेल, तेव्हा देशात दैनंदिन ४ ते ५ लाख नवे कोरोनाबाधित सापडू शकतील, असा अंदाज निती आयोगाने व्यक्त केला आहे. त्यामुळे देशात जवळपास २ लाख आयसीयु बेड तयार ठेवावे लागतील, असा अंदाजही निती आयोगाने सरकारला दिला आहे. याशिवाय ५ लाख ऑक्सिजन बेड आणि १० लाख आयसोलेशन केअर बेडची गरज वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान सप्टेंबर २०२० मध्ये देशात दुसरी लाट येण्याचा अंदाज निती आयोगाने वर्तवला होता. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. मे महिन्यातील काही दिवस देशात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा हा ४ लाखांच्या वर नोंदवला जात होता. एप्रिल ते जून महिन्यातील पॅटर्नचा अभ्यास करून निती आयोगाने आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला असून सरकारला सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे.