CoronaIndiaUpdate : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी तज्ज्ञ काय म्हणतात ?

मुंबई : ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यानंतर या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयारी केली आहे. पण या लाटेची शक्यता धुसर झाल्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तरीही ऑक्टोबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली तरी, अन्या लाटांप्रमाणे कोरोना विषाणूची तिसरी लाट प्राणघातक नसेल, असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारच्या टास्क फोर्सकडून यावर कुठलीही टिप्पणी करण्यात आलेली नाही.
दरम्यान टास्क फोर्सच्या एका सदस्याने सांगितले की, देशात कोरोनाबाधित नवे रुग्ण कमी होत असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटी महाराष्ट्र आणि केरळात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. तुरळक राज्य वगळता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही घटल्याचेही या सदस्याने सांगितलं आहे. शिवाय ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील लसीकरणाचा आकडा ६५ कोटींपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते.
याशिवाय इंडियन सार्स- कोविड 2 जीनोमिक्स कन्सोर्टियमचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी म्हटले आहे की, ‘आणखी तीन आठवडे थांबा म्हणजे, तिसऱ्या लाटेबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरचं मी वास्तविक टिप्पणी करू शकेल.’ तसेच ‘कोरोना विषाणूची तिसरी एक लाट येणार की, नाही हे जाणून घेण्याबाबत निश्चित अशी पद्धत नाही. पण दुसऱ्या लाटेइतकी ती त्रासदायक नसेल, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या यांनीही व्यक्त केले आहे.