MarathaResevation : पुनर्विचार याचिकेचा पाठपुरावा केला आहे का? खा. संभाजी राजे यांचा सरकारला सवाल

नांदेड : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाला नांदेडमधून सुरुवात केली आहे. यावेळी मराठा आरक्षण मिळवण्यासाठीचे पर्याय मांडताना ते म्हणाले कि, एक वेगळा प्रवर्ग निर्माण करुन त्याला सामाजिक, आर्थिक मागास सिद्ध करा. कारण तुम्ही मागास ठरल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे राज्याने ही जबाबदारी घ्यावी. दरम्यान राज्याने पुनर्विचार याचिकेचा पाठपुरावा केला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले कि , आपण संसदेतही मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका मांडली मात्र त्यावेळी मला बोलायची परवानगी दिली नाही. त्यावेळी मला कळलं की भांडल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. आपल्यामागे संपूर्ण मराठा समाज आहे, आपल्याला शिवशाहूंचा वारसा लाभला आहे. पण मग काही खासदारांनीही पाठिंबा दिला आणि मग मला बोलायची संधी मिळाली. त्या खासदारांचेही मी आभार मानतो.
आपल्या भाषणात यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले, “मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्राने घ्यावी. पण ते कुठे आहेत? इथेही ते आलेले नाहीत. ते जेव्हा दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा सगळ्यांना भेटले. काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटले पण मला भेटले नाहीत. संभाजीराजेंना भेटायला त्यांना वेळ नव्हता. पण समाजाला दिशाहीन करुन चालणार नाही.”
कार्यकर्त्यांवर संतापले संभाजीराजे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. नांदेडमधून सुरु होणाऱ्या या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहून संभाजीराजे त्यांच्यावर संतापले आहेत. त्याचबरोबर कोरोना परिस्थितीची जाणिवही त्यांनी उपस्थितांना करून दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, सध्या कोविडची परिस्थिती पाहता आपण एवढी गर्दी करणे खरे चुकीचे आहे. पण मी तुमच्या भावना समजू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुमच्याकडे मास्क असेल तर तो लावावा. नांदेडला कोरोनाचे प्रमाण कमी असले तरी तुम्ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. ते बोलत असतानाच कार्यकर्ते गोंधळ करत होते, घोषणा देत होते. त्यामुळे “ओ बंद करा ना, कोणी बोलू नका’ असे म्हणत संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांना खडसावले आहे.
कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे संभाजीराजेंना फारसे बोलणे शक्य झाले नाही. ते म्हणाले, “हे खऱ्या अर्थाने मूक आंदोलन होते. मूक आंदोलनाचा हेतूच हा होता की समाज बोलला…” मात्र कार्यकर्त्यांच्या गोंधळाला कंटाळून ते म्हणाले, “मी जाऊ का? त्यानंतर मात्र ते पुढे काही वेळ बोलले. ते म्हणाले, मूक आंदोलनाचा अर्थ हाच होता की समाज बोललाय, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही समन्वयक बोललो, आता सरकारने बोलावे म्हणून हे आंदोलन पुकारले होते. मात्र ही गर्दी पाहता लोकप्रतिनिधींना बोलायला मिळेल की नाही अशी शंका वाटत आहे. पण मी त्यांना जास्तीत जास्त बोलू देण्याचा प्रयत्न करेन”.
मुख्यमंत्र्यांच्या पत्राचा स्वीकार नाही…
यावेळी राज्य सरकारने पाठवलेले १५ पानांचे पत्र देखील आपण स्वीकारत नसल्याचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी यावेळी सांगितले. हे पत्र आपण का अस्वीकार करतोय, याची कारणेही यावेळी संभाजीराजेंनी उपस्थितांना सांगितली.
“समाजाला दिशाहीन करणे चालणार नाही. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती इथे बसला आहे. मला एक पत्र आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १५ पानी पत्र पाठवलंय. त्यात त्यांनी समाजासाठी काय काय करतोय, हे लिहिलं आहे. अर्थात त्यांनी आंदोलनाची दखल घेतली, ही चांगलीच गोष्ट आहे. पण या १५ पानी पत्रामध्ये अनेक तफावती आहेत”.
असा जीआर काढून फायदा काय ?
या पत्राविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, “मला हे पत्र पटत नाही. १५ जुलैला सरकारचा एक जीआर निघाला. सरकारने सांगितले की , ज्यांना २०१४ पासून कोविडच्या संकटापर्यंत ज्यांना नियुक्त्या दिल्या आहेत, त्यांना रुजू करून घ्या. समाजाचे लोक खूश झाले. लोक अधिकाऱ्यांकडे गेले, की म्हणतात, तुमचे आरक्षण रद्द झाले आहे. तुम्हाला नोकरी कशी द्यायची. मग हा जीआर काढून काय फायदा? सरकार या बाबतीत झोपलंय का? त्या जीआरचा काय फायदा?” असा सवालही संभाजीराजे भोसले यांनी केला.
“ज्यांची निवड झाली, पण त्यांना अजून नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. त्या मुलांवर अन्याय चालणार नाही. या पत्रात तुम्ही यावर काही लिहिलेय का? या गरीब मराठ्यांची काय चूक आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.