IndiaNewsUpdate : सोनिया गांधी यांनी बोलावली आज विरोधी पक्षांची बैठक

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज सायंकाळी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली असल्याचे वृत्त असून या बैठकीसाठी अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, एम के स्टॅलिन, हेमंत सोरेन आदी नेते सहभागी होणार आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ४.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. सोनिया गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हेदेखील या बैठकीला उपस्थित राहतील.पावसाळी अधिवेशन, पेगॅसस हेरगिरी प्रकरण, करोना संक्रमण, शेतकरी आंदोलन तसंच अफगाणिस्तान – भारत संबंध अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बैठकीमध्ये तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, द्रमुक मुन्नेत्र कळघम, समाजवादी पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीएम, सीपीआय, जनता दल सेक्युलर अशा विविध १५ पक्षांच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.
विद्यमान सरकारच्या नीतींमुळे आणि धोरणांमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यांना पर्याय हवा आहे . २००४ साली सोनिया गांधी यांनी यूपीए तयार करत देशाला एक नवा पर्याय दिला होता. त्याच पद्धतीने पुन्हा एक पर्याय उभे करणे गरजेचे आहे आणि सोनिया त्याच मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे काँग्रेसचे महासचिव तारिक अन्वर यांनी म्हटले आहे.