IndiaNewsUpdate : माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात नांदेडचे जवान सुधाकर शिंदे शहीद

नारायणपूर : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी जवानांवर भ्याड हल्ला केला आहे. इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानावर माओवाद्यांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहे. यामध्ये नांदेडचे जवान सुधाकर शिंदे यांचा समावेश आहे. आज दुपारी १२. १० वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला. जवळपास ६०० मीटर दूर दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर गोळीबार केला.
उपल्बध माहितीनुसार, या हल्ल्यात आईटीबीपीचे जवान सहायक सेनानी सुधाकर शिंदे आणि गुरमुख सिंह शहीद झाले आहे. सुधाकर शिंदे हे नांदेड येथील रहिवासी होते. महाराष्ट्राच्या सुपुत्राला माओवाद्यांशी लढा देताना वीरमरण आले आहे. जवानांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात करियामेटाजवळ रोड ओपनिंग करण्यासाठी गेलेल्या इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानावर माओवाद्यांचा बेछुट गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर माओवाद्यांनी जवानांच्या एके ४७ बंदुकीसह वाकीटॉकी लुटून नेली.