WorldNewsUpdate : हैतीमध्ये विनाशकारी भूकंपात ३०४ मृत्यू तर १८०० हुन अधिक जखमी

हैती : कॅरेबियन देशात शनिवारी नैऋत्य हैतीमध्ये झालेल्या ७.२ रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपामुळे आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती हैतीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. आधीच कोरोनाशी सामना करत असलेल्या हैतीच्या नागरिकांचे जनजीवन भूकंपामुळे पूर्णतः विस्कळीत झाले आहे. राष्ट्रपतींची हत्या आणि वाढत्या गरीबीमुळे हैती देशावरील आर्थिक संकट वाढत चालले असल्याचे सांगण्यात आहे.
हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री यांनी म्हटले आहे कि , भूकंपामुळे कॅरिबियन देशाच्या दक्षिण भागात “प्रचंड नुकसान” झाले असून , पीडितांना मदत करण्यासाठी उपलब्ध असलेली सर्व सरकारी संसाधने एकत्रित केली जातील. दरम्यान भूकंपामुळे पंतप्रधान एरियल हेन्री यांनी एक महिन्यासाठी आणीबाणीची स्थिती जाहीर केली.
अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेक्षणाकडून दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून १२५ किलोमीटरवर असल्याचे सांगण्यात आले आहे. भुकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर काही सौम्य धक्केही जाणवले. त्यामुळे भीतीच्या सावटाखाली नागरिकांनी रात्र रस्त्यावरच काढली. आतापर्यंत या दुर्घटनेत ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे कमीत कमी ८६० घरे जमिनदोस्त झाली आहेत. तर ७०० हून अधिक घरांना तडे गेले आहेत. नागरिकांना तात्काळ मदत करण्याचे आदेश पंतप्रधान एरियल हेनरी यांनी दिले असून देशात १ महिना आपतकालीन स्थितीची घोषणा केली आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी हैतीमध्ये मोठ्या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त करून म्हटले आहे कि, अमेरिकेकडून आपण मदत जाहीर केली असून त्यासाठी यूएसएआयडी प्रशासक सामंथा पॉवर यांना समन्वयक म्हणून नेमले आहे. “यूएसएआयडीच्या माध्यमातून, आम्ही नुकसानीचा अंदाज घेऊन आवश्यक ती मदत पोहोचवत आहोत. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही आम्ही हैतीच्या लोकांसोबत असल्याचे म्हटले असून तत्काळ वैद्यकीय मदत पुरवत काम सुरु केले आहे. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली या देशांनीही मदतीची घोषणा केली आहे.