CoronaMaharashtraUpdate : राज्यात डेल्टा प्लसचे ६५ रुग्ण तर ५ हजार ५६० नवे कोरोनाबाधित

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात ५ हजार ५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ९४४ इतकी आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,६६,६२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान राज्यात डेल्टा प्लसचा धोका आणखी वाढला असून आतापर्यंत डेल्टा प्लसचे ६५ रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज १६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०१,१६,१३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६९,००२ (१२.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मागील वर्षी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पुणे शहरात या विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही पुणे शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव झाला होता. जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यातच आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात सध्या १४ हजार ४१९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या खालोखाल मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.