CoronaIndiaUpdate : मुलांना सांभाळा , कर्नाटकात २४२ मुले कोरोनाबाधित

बंगळुरू : कोरोना संसर्गाची दुसरी लाट काहीशी आटोक्यात येत नाही तोच कर्नाटकातल्या बेंगळुरू शहरात गेल्या पाच दिवसांत बेंगळुरूमध्ये २४२ मुलांना कोविड-१९ ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, मंगळवारी बेंगळुरूमध्ये १३३८ नव्या कोरोनाबाधितांची आणि ३१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले असून त्यांची काळजी घेण्याची गरज आहे.
बंगळुरू महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षांखालच्या २४२ जणांचा कोरोना अहवाल गेल्या पाच दिवसांत पॉझिटिव्ह आला आहे. त्यात नऊ वर्षांखालच्या १०६ मुलांचा, तर ९ ते १९ वर्षं या वयोगटातल्या १३६ मुलांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत मुलांमधल्या कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू शकते, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
दरम्यान आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले कि , ‘लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाचं प्रमाण येत्या काही दिवसांत तिप्पट होऊ शकते. हे खूप धोकादायक आहे. मुलांना त्यापासून वाचवण्यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे त्यांना घरातच ठेवणे. मुलांच्या शरीरातली प्रतिकारशक्ती मोठ्यांएवढी नसते. त्यामुळे पालकांना कळकळीचं आवाहन आहे, की त्यांनी त्यांच्या मुलांना घराबाहेर पडू देऊ नये. तसेच, कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचं पालन केले जावे.’
राज्यातील कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता कर्नाटक सरकारने आधीच रात्रीची संचारबंदी , तसेच शनिवार-रविवारच्या कडक संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. केरळमधून, तसेच महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवशांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. आधीच्या ७२ तासांमध्ये केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल, अशा व्यक्तींनाच राज्यात प्रवेश दिला जात आहे. काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्टपासून राज्यात अंशतः लॉकडाउन लागू केला जाणार असल्याची शक्यता आहे.कर्नाटक राज्यात गेल्या महिन्याभरात दररोज सुमारे दीड हजार कोरोनाबाधितांची भर पडत आहे. कर्नाटकात सध्या महिन्याला लशीचे ६५ लाख डोसेस दिले जात आहेत. हे प्रमाण वाढवून एक कोटीपर्यंत नेणार असल्याची ग्वाही कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईयांनी दिली आहे.