CoronaWorldUpdate : WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी कोरोनाच्या स्थितीवर केले असे धक्कादायक वक्तव्य !!

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून जग कोरोना संसर्गाशी लढा देत असून ज्या देशांमध्ये कोरोनाविषयक नियमांच्या पालनासोबतच लसीकरण मोहीम चालू आहे त्या देशातील कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र आहे . त्यामुळे जगभरातल्या अनेक देशातील नागरिक पुन्हा पूर्वीप्रमाणेच जनजीवन जगताना दिसत आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी इशारा देताना म्हटले आहे कि , कोरोनाविरोधात सुरू असलेला आपला लढा ही परीक्षा आहे, पण आपण त्या परीक्षेत पराभूत होत आहोत. डॉ. टेड्रॉस यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीसमोर बोलताना जगभरातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करताना हे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलताना डॉ. टेड्रॉस यांनी यावेळी जागतिक स्तरावर कोरोना लसीच्या वाटपातील असमानतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे कि , “कोरोनाची लस इतर देशांना देणे, चाचणी आणि उपचार करणे यामध्ये येणाऱ्या अपयशामुळे जगात करोनाच्या दोन साथी तयार झाल्या आहेत. एक साथ अशा देशांमध्ये आहे, जिथे लस, औषधे असे उपचार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून त्या आधारावर या देशांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर दुसरी लाट अशा देशांमध्ये आहे, जिथे लस, औषधोपचार यांचा तुटवडा असल्यामुळे हे देश कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारत आहेत”.
डॉ. टेड्रॉस यांनी कोरोना संकटाच्या दूरगामी परिणामांविषयी चिंता व्यक्त करताना म्हटले आहे कि , “जितका जास्त काळ कोरोनाचे संकट जगात राहील, तेवढी समाजात सामाजिक आणि आर्थिक उलथापालथ पाहायला मिळेल. ही साथ म्हणजे एक परीक्षा आहे आणि या परीक्षेत जग पराभूत होत आहे”. दरम्यान, जगातील ज्या राष्ट्रांकडे कोरोनाची लस मुबलक प्रमाणात आहे, त्यांनी इतर कमतरता असणाऱ्या देशांना ही लस देण्याची आवश्यकता आहे. कोरोना लसीच्या वाटपामध्ये समानता येणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
जगातील १२४ देशांमध्ये होतो आहे डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव !!
दरम्यान, जगभरातल्या १२४ देशांमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा फैलाव झाला असल्याची माहितीही टेड्रॉस यांनी यावेळी दिली आहे. “हा व्हेरिएंट लवकरच इतर प्रकारांपेक्षा अधिक धोकादायक होईल. येत्या काही महिन्यांमध्येच हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल”, असेही टेड्रॉस यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाचे डेल्टा व्हेरिएंटव्यतिरिक्त आत्तापर्यंत तीन प्रमुख व्हेरिएंट कन्सर्न अर्थात VoC आढळून आले आहेत. त्यामध्ये अल्फा व्हेरिएंट सर्वात आधी ब्रिटनमध्ये आढळून आला होता. त्यानंतर त्याचा तब्बल १८० देशांमध्ये फैलाव झाला. गेल्या आठवड्याभरात ६ देशांची भर पडली आहे. बीटा व्हेरिएंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आला होता. त्याचा जगभरातल्या १३० देशांमध्ये आत्तापर्यंत फैलाव झाला आहे. यातले शेवटचे ७ देशांमध्ये गेल्या आठवड्याभरात फैलाव झाला आहे. तर गामा व्हेरिएंट सर्वात आधी ब्राझीलमध्ये आढळून आला होता. त्याचा ७८ देशांमध्ये फैलाव झाला आहे. गेल्या आठवड्याभरात शेवटच्या तीन देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळून आले आहेत.