EducationNewsUpdate : युपीएससीकडून मागासवर्गीयांच्या गुणदानात भेदभाव , सामाजिक न्याय मंत्र्यांचे पत्र

नवी दिल्ली : “केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना गुण देताना जातीआधारीत भेदभाव केला जात आहे”, असा गंभीर आरोप दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी यूपीएससीच्या संचालकांना पत्र लिहून केला आहे. या पत्रात त्यांनी उमेदवारांची जात उघड न करण्याचा सल्ला दिला आहे. राखीव कोट्यातील उमेदवारांना मुलाखतीमध्ये कमी गुण देण्याचे प्रकार घडत असल्याचे आरटीआय मधून स्पष्ट झाले होते , असे वृत्त एएनआयने दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर राजेंद्र गौतम यांनी हे पत्र UPSC ला पाठवले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे संचालक प्रदीप कुमार जोशी यांना लिहलेल्या पत्रात गौतम यांनी म्हटले आहे कि , “यूपीएससी मुलाखतींमध्ये राखीव कोट्यातील अनेक उमेदवारांना जातीआधारीत भेदभावाचा सामना करावा लागत आहे. या उमेदवारांना गुण देताना पद्धतशीरपणे भेदभाव केला जात आहे. मला यासंदर्भात अनेक समाजाच्या उमेदवारांनी पत्र लिहून त्यांच्या भावना सांगितल्या आहेत. यातल्या अनेक उमेदवारांना अशा प्रकारच्या भेदभावाचा सामना करावा लागत आहे”.
यावर उपाय सुचवताना गौतम यांनी पुढे म्हटले आहे कि , “राखीव कोट्यातील उमेदवारांची जात उघड न केल्यास अशा प्रकारचा भेदभाव टाळता येईल. तसेच, राखीव आणि खुला प्रवर्ग अशा प्रकारे गट करून मग त्यांच्या मुलाखती न घेता सरसकट गट करून मुलाखती घेतल्यास या गोष्टीला आळा बसू शकेल”, हा पर्याय UPSC ला सहज अंमलबजावणी करता येण्यासारखा आहे. यामुळे सर्व उमेदवारांना मुलाखतीच्या टप्प्यावर समान संधी आणि न्याय्य वागणूक मिळू शकेल.