IndiaPoliticalUpdate : प्रशांत किशोर यांच्याकडून शरद पवारांच्या नावाची संभाव्य राष्ट्रपतीपदासाठी चर्चा

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी , काँग्रेस नेते राहुल गांधी , प्रियांका गांधी आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केवळ आगामी निवडणुकाच नव्हे तर आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांवरही चर्चा झाल्यावृत्त आहे. यावेळी राष्ट्रपती पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.
प्रशांत किशोर यांनी सांगितले की, विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या नावाला अधिकची पसंती आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली होती. मंगळवारी किशोर यांनी दिल्लीतील एका काँग्रेसखासदाराच्या निवासस्थानी सोनिया गांधी , राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची भेट घेतली. ही भेट पंजाब कॉंग्रेस किंवा आगामी विधानसभा निवडणुकांमधील सुरू असलेला कलह दूर करण्यासाठी करण्यात आली होती, असे सांगितले जात होते. दरम्यान कॉंग्रेसने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून त्यासाठी ही बैठक केल्याचेही म्हटले जात आहे.
दरम्यान २०१७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत कॉंग्रेस अपयशी ठरल्यानंतर पाच वर्षांनी राहुल गांधी आणि किशोर यांची भेट झाली. त्यावेळी समाजवादी पक्षाबरोबर युती करुन यूपी विधानसभा निवडणूक लढविणारी कॉंग्रेस अपयशी ठरली होती आणि पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.