CoronaMaharashtraUpdate : ८ लाख लोकांना डोस देऊन राज्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण !!

मुंबई : देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना लसीकरण वेगाने सुरु आहे. महाराष्ट्र राज्याने लसीकरणात विक्रमी नोंद केली असून शनिवारी ८ लाख १ हजार ८४७ कोरोना लसीचे डोस देण्यात आले. या निमित्ताने राज्याने यापूर्वीचा दैनंदिन रेकॉर्ड ब्रेक केला असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.
शनिवारी रात्रीपर्यंत राज्यात एकूण डोसची संख्या ३.३९ कोटी होती. आम्ही कोविड लसीकरणात रेकॉर्ड ब्रेक केल्याचं व्यास यांनी सांगितलं आहे. याआधी सर्वोत्तम दैनंदिन रेकॉर्ड २६ जून रोजी नोंदवण्यात आला. २६ जून रोजी राज्यात ७ लाख ३८ हजार ७०४ कोरोना लसीचे डोस देण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण मोहिमेमध्ये राज्य सातत्याने सर्वोच्च स्थानावर असल्याचं, डॉ. व्यास यांनी सांगितलं.
देशातल्या लसीकरणाला १६९ दिवस पूर्ण
देशात कोरोना लसीकरणाचे १६९ दिवस पूर्ण झालेत. या दिवसात देशात ३५ कोटी लसीचे डोस देण्यात आलेत. १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह अंतर्गत आतापर्यंत कोरोना व्हॅक्सिनचे एकूण ३५ कोटी डोस लावण्यात आले. भारतानं केवळ १६९ दिवसांत हा आकडा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच्या डेटानुसार आतापर्यंत ३५.०५ कोटी लसीचे डोस देण्यात आलेत.
केवळ शनिवारी ५७.३६ लाखांहून जास्त लोकांनी लसीकरण केलं आहे. यात १८ ते ४४ वर्षांपर्यत २८.३३ लाख लोकांनी पहिला आणि ३.२९ लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोविन पोर्टलनुसार, शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत ६३.३९ लोकांनी आतापर्यंत लोकांनी कोरोना लस घेतली आहे.
१८-४४ वर्षांचे १० कोटींहून जास्त लोकांचे लसीकरण
३७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात या वयोगटातील १०.२१ कोटी लोकांनी पहिला डोस घेतला आहे. आठ राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राज्यस्थान, तमिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रात हा आकडा ५० लाखांहून अधिक आहे. याव्यतिरिक्त आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील १० लाखांहून अधिक लोकांनी लस घेतली आहे.