MumbaiNewsUpdate : धक्कादायक , नवी मुंबईतही ३५० जणांचे बोगस लसीकरण

मुंबई : मुंबईतील कांदिवली येथे बोगस लसीकरणाचे प्रकरण ताजे असतानाच आता नवी मुंबईतही बोगस लसीकरण करण्यात आल्याचे वृत्त आहे.पोलिसांनी याप्रकणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हे लसीकरण ज्यांनी कांदिवलीत केले, त्याच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त करण्यात आला आहे. नवी मुंबईमधील शिरवणे एमआयडीसीतील एटोमबर्ग टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीतील ३५० कर्मचाऱ्यांचे बोगस लसीकरण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणात तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी डॉ. मनिष त्रीपाठी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ त्रिपाठी यानेच याआधी मुंबईतील कांदिवली येथे बोगस लसीकरण केले असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कांदिवली येथे गुन्हा दाखल केला होता. आता शिरवणे एमआयडीसीतील प्रकारानंतर तुर्भे पोलिसानी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
धक्कादायक म्हणजे लोकांना लस देण्याच्या नावाखाली बोगस लस देत त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार केला. मुंबईतील कांदवली, खार आदी ठिकाणी बोगस लसीकरण केल्याचा प्रकार पुढे आला होता. या प्रकरणी एका आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाकडूनही याची दखल घेतली गेली. त्यानंतर सरकारला फटकारले. मुंबई पालिकेनेही यापुढे असे होणार नाही, असे स्पष्ट केले.
बोगस लसीकरणाबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरातील शिवम रुग्णालयाविरोधात बोगस लसीकरणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनतर येथील संचालक आणि डॉक्टर यांना अटक करण्यात आली आहे. शिवम हॉस्पिटलची नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीने आत्मसमर्पण केले होते.