AurangabadNewsUpdate : लाॅकडाऊनचे वाढते निर्बंध, पोलीस आणि गृहराज्यमंत्र्यांचे कानावर हात !!

औरंगाबाद : मुंबई, नागपूर , पुणे , पिंपरी-चिंचवड, नांदेड शहरानंतर औरंगाबाद शहरात कोरोना बंदोबस्तादरम्यान औरंगाबाद शहरातही पोलिसांना मारहाण करण्याचा प्रकार घडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र औरंगाबादच्या घटनेत एनएसजी जवान म्हणून भारतीय निमलष्करी दलात कार्यरत असलेल्या कमांडोनेच पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्याला मारहाण करावी हे खेदजनक आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत औरंगाबाद आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्या मुख्यालयाला या जवानांचे गैरवर्तन कळविण्यात आले आहे.
दरम्यान कोरोना बंदोबस्तादरम्यान पोलिसांवरील हल्ल्याविषयी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कानावर हात ठेवत माहिती घेतो आणि सांगतो असे म्हटले खरे पण त्यांचा पुन्हा संपर्कच झाला नाही. याची गंभीर दखल सरकारने घेतली नाही तर पोलिसांचे मनोबल वाढणार कसे हा प्रश्न आहे.
बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नगरनाक्यावर कर्तव्य बजावत असलेले छावणी पोलिस ठाण्याचे एपीआय पांडुरंग भागिले यांनी मास्क न वापरणार्या एका जीप चालकाला अडवताच त्याने खाली उतरुन कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता एपीआय भागिले व त्यांच्या सहकार्यांना मारहाण केली.
गणेश गोपीनाथ भुमे (३४) रा.फुलंब्री असे आरोपीचे नाव आहे. आरोपी भूमे हा दिल्लीच्या सेंट्रल पोलिस फोर्समधे रेंजर टू या पदावर कार्यरत आहे. ही घटना घडल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जनतेच्या सेवेसाठी आणि आरोग्यासाठी जर पोलिसच पोलिसांचे डोके फोडत असतील तर सामान्य जनतेवर कसा वचक ठेवणार ? असा प्रश्न असल्याने याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनानुसार उपयुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी आरोपीच्या युनिटचे अधीक्षक एस. महेंद्र यांना या गुन्ह्याची माहिती देऊन त्याच्यावर कार्यालयीन कारवाई करण्याचा प्रस्तावही पाठवला.
दरम्यान आधीच लाॅकडाऊनमुळे त्रस्त झालेली जनता थोडाफार दिलासा मिळाल्यानंतर दिनचर्या सुरु करंत असतांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लाॅकडाऊनचे निर्बंध वाढवले खरे परंतु जनता या निर्णयावर नाराज असून जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यापाऱ्यांच्या बाजूने प्रश्नाशी चर्चा सुरु केली आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयावर जनतेमध्ये असंतोष असून त्याचे परिणाम बंदोबस्तावरील पोलिसांना भोगावे लागत आहेत.
शहरात घडलेला हा सर्व घटनाक्रम गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कळल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला.तेंव्हा मी औरंगाबाद पोलिसांशी बोलून दहा मिनटात काॅलबॅक करतो असे सांगितले. पण दहा मिनिटाने आमच्या प्रतिनिधीने सतेज पाटलांना फोन केला असता त्यांनी बोलणे टाळल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. खरे तर कोरोना बंदोबस्तवार स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांची काळजी जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाने घेणे गरजेचे आहे.