MaharashtraNewsUpdate : जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूका लावल्याने भुजबळ संतापले

मुंबई : निवडणूक आयोगाने राज्यातील ५ जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूका जाहीर केल्यामुळे ओबीसी नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा वादात असल्यामुळे या निवडणूक घेऊ नयेत अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली होती शिवाय राज्यातील कोविड काळात निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मंत्रिमंडळात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या विषयावर पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले कि , दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात जोपर्यंत कोरोनाच संसर्ग आहे तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेणार नाही, असे स्पष्ट केले होते. तरीही , मंगळवारी राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी ५ जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा केल्यामुळे आश्चर्य वाटते. दरम्यान यापूर्वी ही मागील सरकारमध्ये ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका घ्या असे ओबीसी नेते घेत होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला नाही. राज्य सरकारने केंद्राकडे डेटा गोळा करण्याचे मागण्या केल्या, पण केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. तेंव्हा कोविड नव्हता मग देवेंद्र फडणवीस सरकारने डेटा का गोळा केला नाही, असा प्रश्नही उपस्थित करून ते म्हणाले कि , देवेंद्र फडणवीस यांनी पुढे समोर येऊन याबद्दल केंद्राला डेटा देण्यास सांगावे .
मंडल आयोगामुळे शिवसेना सोडली
मी मंडल आयोग आणि ओबीसी मुद्यावर शिवसेना सोडली, त्यावेळी सेना सोडणे शक्य होत का? शरद पवार यांनी त्यानंतर ओबीसी आरक्षण दिले , ते २७ वर्ष चालले , नंतर नागपूरच्या मंडळींनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेलं ? का नेले नागपुरकरांनी? असा सवालही करीत भुजबळ यांनी भाजपला टोला लगावला.
याबाबत ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनीही राज्यात या काळात कुठल्याही निवडणूका , पोट निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तरीही निवडणूका जाहीर झाल्याने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी होण्याची शक्यता आहे.