PoliticalNewsUpdate: पवारांचा नवा “वार ” नव्या “राष्ट्र मंच”साठी खलबते !! उद्या १५ पक्षाच्या नेत्यांची बैठक

नवी दिल्ली : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्ली दौऱ्यावर असून मोदी विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी त्यांनी उद्या त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला १५ पक्षांचे नेते सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत “राष्ट्रमंच” या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा असल्याचे वृत्त आहे. मोदी सरकारच्या धोरणांविरोधात उद्या “राष्ट्र मंचा”ची उद्या ४ वाजता दिल्ली येथे बैठक होणार आहे. शरद पवार पहिल्यांदाच या बैठकीत भाग घेतील. २०१८ मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंच स्थापन केला. सिन्हा आता टीएमसीचे उपाध्यक्ष आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर हात फिरवून शरद पवार रविवारी रात्री दिल्लीत पोहचले असून २३ जूनपर्यंत ते दिल्लीतच असणार आहेत. शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे.
प्रशांत किशोर यांच्यासोबत दुसऱ्यांदा बैठक
पॉलिटिकल इव्हेन्ट मॅनेजमेंटचे तज्ज्ञ प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईनंतर दिल्लीत पुन्हा बैठक झाल्याने राजकीय चर्चांना जोर आला आहे. मागील आठवड्यातच प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली होती. तब्बल 3 तासही बैठक सुरू होती. या बैठकीत देशासह राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान देशभरात नव्याने रणनीती आखण्यात यावी, यासाठी काय नियोजन केले जावे, महाराष्ट्र विधानसभेत कशा पद्धतीने रणनीती आखली जावी, यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांच्यासोबत राज्यात रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने नियोजन करावे, काय समीकरण आखले जावे, मतदारसंघनिहाय कसे नियोजन असावे, याबद्दलही किशोर यांनी भाष्य केले.