MarathaAndolanUpdate : २५ जूनला मुंबईत गोलमेज परिषद, उपमुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्या बैठकीवर समाधान नाही : सुरेश पाटील

कोल्हापूर: घरात बसलो तर काहीच मिळणार नाही याची आम्हाला खात्री झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत काही मिळत नाही, तोपर्यंत चर्चांना अर्थ नाही, असे सांगत मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षणासाठीच्या रस्त्यावरच्या लढाईवर आपण ठाम असल्याचे प्रतिपादन केले.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संभाजीराजे यांच्या बैठकीवर आम्ही समाधानी नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान येत्या २५ तारखेला मुंबईत गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे.
मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीने १२ मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या. त्यापैकी ८ मागण्या मान्य केल्याचे सांगून गेल्या वर्षी राज्य सरकारने आमचे आंदोलन थांबवले. मात्र यातील एक ही मागणी अद्याप पूर्ण केली नाही. आंदोलन करायला लागलो तर सरकार पोकळ आश्वासन देऊन पानं पुसण्याचं काम करतं. त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाची धार वाढवली जाणार नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही आणि हा प्रश्न सुटणार नाही, असं पाटील म्हणाले.
दरम्यान राज्यातील आघाडी सरकार विश्वासघातानं आलं आहे. हे सरकार आल्यापासून राज्यात जातीय तेढ कशी निर्माण होईल, असं वातावरण तयार केलं जात आहे. ओबीसींचं आरक्षण घालवलं. मराठ्यांचं आरक्षण घालवलं. केवळ तारखांवर तारखा घेतल्या, अशी टीकाही त्यांनी केली.
मुंबईत २५ तारखेला गोलमेज परिषद
येत्या २५ तारखेला मुंबईत गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे. त्यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे. या गोलमेज परिषदेला माजी मुख्यमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनाही परिषदेला आमंत्रित केले जाणार आहे, असे सांगतानाच प्रश्न सुटेपर्यंत रस्त्यावरचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . तसेच केंद्राविरोधात आंदोलन करावे लागले तर तेही करू, पण सध्या प्रश्न राज्याचा आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.