MumbaiNewsUpdate : परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात नव्याने हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतल्या एका विकासकाने ही याचिका दाखल केली असून दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये परमबीर सिंह यांनी त्यांच्या म्हणजेच विकासकाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात येऊ नये, यासाठी २०० कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे.
याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार विकासक दिपक निकाळजेसोबत अर्जदार कार्तिक भट याने चेंबूरमधील एका झोपडपट्टी पुनर्वसन गृहनिर्माण प्रकल्प सुरु केल्याचे सांगत साडे तीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष मिठबावकर यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात भट विरोधात२०२० मध्ये एफआयआर दाखल केली होती. एफआयआर प्रमाणे तपास न करण्यासाठी चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन आपल्याकडे २०० कोटी रुपयांची लाच मागितली होती. तसंच सदर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ४२५ कोटींच्या उत्पन्नातील १० टक्क्यांचीही मागणी केल्याचा आरोप या याचिकेत केला आहे.
याव्यतिरिक्त २०१८ मध्ये याच गृहनिर्माण प्रकल्पासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनीही परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन आपल्याकडे खंडणी मागितली होती, असा आरोपही अर्जदार भट यांच्याकडून अर्जात करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी शालिनी शर्मा आणि पराग मणेरे यांच्यासोबत अनेक व्यावसायिकांकडून अशाच प्रकारे खंडणी गोळा केल्याचा आरोपही अर्जात केला आहे.