MumbaiNewsUpdate : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना अटकेपासून १५ जूनपर्यंत संरक्षण

मुंबई : मुंबई व ठाण्याचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात पोलिस अधिकारी भीमराज घाडगे यांनी केलेल्या एफआयआर प्रकरणात यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. कारण १५ जूनपर्यंत परमबीर सिंह यांचे संरक्षण कायम ठेवण्यात आले असून १५ जूनच्या पुढील सुनावणीपर्यंत अटक कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात दिली आहे.
पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्यासाठी त्यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणला. मी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी कट रचून मला लक्ष्य केले आणि माझ्याविरोधात ५ धादांत खोटे एफआयआर नोंदवायला लावले, असे निदर्शनास आणत घाडगे यांनी भारतीय दंड संहिता व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान परमबीर सिंह यांना याआधी झालेल्या सुनावणीमध्ये ९ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांना दिलासा मिळाला आहे. १५ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून या सुनावणीनंतर सिंह यांच्याविरोधीत इतर आरोपांच्या तपासालाही वेग येण्याची शक्यता आहे.