मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

काल अखेर केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्याचे आगमन झाले असून त्यामुळे काल सकाळपासूनच केरळातील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर पुढील दोन तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान एककीकडे राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार होत असताना, मागील काही दिवसांपासून राज्यात पूर्व मोसमी पावसाने जोर धरला आहे. येत्या तीन ते चार तासांत पुण्यासह, बारामती, शिरूर, इंदापूर, रायगड, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान याठिकाणी वाऱ्याचा वेग ३०ते ४० किमी प्रतितास इतका असेल. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त, पुढील २ ते ३ दिवसांत राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, रायगड, द. कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.