कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ६२४ डॉक्टरांचा मृत्यू

भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, भारतात दुसऱ्या लाटेमध्ये तब्बल ६२४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल २३ डॉक्टरांचा समावेश आहे. सर्वाधिक मृत्यू दिल्लीमधील डॉक्टरांचा झाला आहे. दिल्लीमध्ये १०९ डॉक्टर कोरोनाच्या संकटात मृत्यूमुखी पडले आहेत. त्याखालोखाल मृत्यू हे बिहारमध्ये झाले असून ९६ डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये तब्बल ७९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी देशात एक लाख ३४ हजार १५४ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन हजार८८७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत दोन लाख ११ हजार ४९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप कोरोना संकट संपलेलं नाही. बुधवारी ७४ हजार ४५८ उपचाराधीन रुग्ण घटले आहेत. मागील महिनाभरापासून नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच देशातील उपचाराधीन रुग्णांच संख्या सातत्यानं कमी होत आहे. देशात सध्या १७ लाख १३ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात बुधवारी जवळपास १५ हजार रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात नवीन कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त होती.