मान्सूनचे केरळात आगमन , यंदा १०६ टक्के पाऊस

महाराष्ट्रासाठी सुखद बातमी म्हणजे मान्सूनचे केरळात आगमन झाले आहे. पुढील काही दिवसांत त्याचे आगमन गोवा आणि तळकोकणात होणार आहे.अंदमान बेटांवर २१ मे रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ तयार झाले. त्यामुळे मान्सूनला चाल मिळाल्याने गुरुवारी मान्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागांत वाटचाल केली.
हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार, मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्राला मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. आजही राज्यात पूर्व मोसमी पावसाचे सावट घोंघावत आहे. आज दुपारपासूनचं पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद लातूर आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे याठिकाणी पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.