IndiaNewsUpdate : महिन्यातून एकदा निरर्थक बोलणे , ‘मन की बात’ कार्यक्रमावरून राहुल गांधी यांचे मोदींवर टीकास्त्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली असून याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. मात्र, तत्पूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर ‘मन की बात’ कार्यक्रमावरून ट्विट करत निशाणा साधला आहे. “कोरोनाशी लढण्यासाठी पाहिजे – योग्य हेतू, धोरण, निश्चय. महिन्यातून एकदा निरर्थक बोलणे नाही”, अशा शब्दांमध्ये ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
कोरोना से लड़ने के लिए चाहिए-
सही नीयत, नीति, निश्चय।महीने में एक बार निरर्थक बात नहीं!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 30, 2021
दरम्यान, कोरोना साथीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे कोणतीही रणनीती नाही. लसीकरण मोहीम मोदी सरकारने योग्य पद्धतीने राबविली नाही तर कोरोना साथीच्या लाटांवर लाटा थडकत राहतील व त्या अधिक भयानक असतील असा इशारा राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिला होता. कोरोना साथीचे निर्मूलन करायचे असेल तर लसीकरण हाच एकमात्र उपाय आहे. लॉकडाऊन, मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे यामुळे कोरोना साथ संपणार नाही. तिचे निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. कोरोना लस देण्यात आपण जितका उशीर करू तितके या विषाणूची नवनवीन उत्परिवर्तने व प्रकार अस्तित्वात येऊन माणसांवर हल्ला करतील. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याचीही भीती आहे. कोरोना विषाणू आपले रूप सतत पालटत असतो, असे दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत राहुल गांधी म्हणाले होते. तसेच, कोरोना साथ भीषण रूप धारण करू शकते, असा इशारा मी पहिल्यापासून देत होतो, पण त्याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले. देशातील लोकसंख्येपैकी फक्त तीन टक्के लोकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.
पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यांनीही पंतप्रधान नरेंद्रमोडी यांच्यावर टीका करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आपल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले कि , नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली पण सात वर्षात मोदी सरकार सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पहिल्या लाटेत नमस्ते ट्रम्पच्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलीगीच्या नावावर कोरोनाचे खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा उद्योग केला तर दुसऱ्या लाटेतही कोरोनाचे रुग्ण व मृत्यू वाढत असताना मोदी सरकार विधानसभेच्या प्रचारात दंग होते. मोदींनी आपल्या मनमानी कारभाराने १३० कोटी जनतेला कोरोनाच्या खाईत लोटले, त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नसून त्यांनी राजीनामा द्यावा.