MaharashtraCrimeUpdate : कर्जबाजारी पती -पत्नीने ९० हजारात आपले बाळ विकण्याचा सौदा केला आणि ….

कल्याण : एका कर्जबाजारी दाम्पत्याने आपल्या पाच महिन्यांच्या लहान बाळाला एका एजंट महिलेला विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ठाण्याच्या शहाडमध्ये राहणारे साईनाथ भोईर आणि त्यांची पत्नी पल्लवी भोईर यांना तीन मुलं आणि तीन मुली आहेत. ते रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु लॉकडाऊन काळात रिक्षा बंद असल्याने त्यांच्यावर बरेच कर्ज झाले. दरम्यानच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या मानसी जाधव नावाच्या महिलेने साईनाथ भोईर यांना त्यांचा पाच महिन्याचा मुलगा विकणार का? असा प्रश्न विचारला. यासाठी तिने त्यांना काही वेळ विचार करायलाही दिला.
दरम्यान भोईर कुटुंबीयांनी अखेर हा पर्याय स्वीकारला आणि त्यांनी अवघ्या 90 हजार रुपयात आपल्या पाच महिन्याच्या बाळाला विकण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मानसी ते बाळ पुढे 2 लाखात विकणार होती, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली. ठरल्याप्रमाणे मानसी कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या दीपक हॉटेल येथे भोईर दाम्पत्याकडून पाच महिन्याच्या बाळासा विकत घेणार होती. त्यानुसार भोईर पती-पत्नी आणि मानसी तिथे दाखलही झाले. पण नेमके पोलीसही घटनास्थळावर दाखल झाले. अखेर त्यांनी सापळा रचत तिला आणि भोईर दाम्पत्याला रंगेहाथ पकडले.
टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणात पोलिसांनी मानसी जाधव हिला ताब्यात घेऊन तिने आतापर्यंत किती गरीब कुटुंबियांच्या गरिबीचा फायदा घेत , अशी किती मुले विकत घेतली ? याचा तपास पोलिस करीत आहेत. ठाणे मानवी तस्करी विरोधी विभागाचे प्रमुख अशोख कडलक यांना माहिती मिळाली होती की, बदलापूर येते राहणारी मानसी जाधव ही महिला एका गरीब कुटुंबांतील पाच महिन्याच्या मुलाला विकत घेणार आहे. या माहितीवरून अशोक कडलक यांच्या पथकाने कल्याण पश्चिमेतील दीपक हॉटेल येथे सापळा रचला आणि मुलाचे वडिल साईनाथ भोईर आई पल्लवी भोईर आणि महिला एजंट मानसी जाधव याना रंगेहाथ अटक केली. या तिघांना महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे एपीआय सचीन पत्रे करीत आहेत. या तिघांना कल्याण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांना 25 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.