AurangabadCrimeUpdate : वाळूजमधील “त्या ” खुनाचा अवघ्या १२ तासात तपास , तिघांना ठोकल्या बेड्या

औरंगाबाद : वाळुज एमआयडीसीतील कुख्यात गुन्हेगाराची प्रधान गँगने दगडाने ठेचून हत्या केली. ही खळबळजनक घटना २१ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास बजाजनगरातील मृगनयनी हॉटेलजवळ घडली. विशाल उर्फ मड्ड्या किशोर फाटे (२६, रा. शिवाजीनगर, वडगाव कोल्हाटी) असे हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. वाळूज एमआयडीसी भागात अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली आहे. तर गँगवॉरमधून विशालची हत्या झाल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. दरम्यान, विशाल हा खून प्रकरणात जामिनावर बाहेर आलेला होता. पोलिसांनी हत्ये प्रकरणी प्रधान गँगच्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
वडगाव कोल्हाटीमधील विशाल फाटे स्वत:ला बजाजनगरचा स्वयंघोषीत डॉन समजायचा. नेहमी नशेत राहणारा विशाल कायम हत्यार बाळगायचा. त्याने दोन दिवसांपुर्वी वाळुज औद्योगिक वसाहतीतील एका मासे विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवत फुकटात मासे नेले होते. याप्रकरणी मासे विक्रेत्याने तक्रार दिली नव्हती. तसेच प्रधान गँगमधील एकाला विशालने लुटले होते. त्यामुळे प्रधान गँगमधील सदस्य तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. पण पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नव्हती.
विशाल हा हैदराबाद येथील विम्टा क्लिनीक्स या खासगी कंपनीत कामाला होता. तो नुकताच १९ मे रोजी सुटीवर आला होता. २१ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास मड्ड्याने लहान भाऊ अनिकेत याला सांगितले होते की, जुन्या भांडणातून अजय प्रधान, नामदेव प्रधान, सचिन उर्फ गोट्या प्रधान व अतीश काळे हे जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे वाढदिवस झाल्यानंतर पुन्हा हैदराबादला जाणार असल्याचेही त्याने भावाला सांगितले होते. त्यानंतर तो सकाळी साडेनऊच्या सुमारास सलूनमध्ये जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडला होता. पुढे रात्री सव्वादहाच्या सुमारास अनिकेत याला त्याचा मित्र सागर मजेठिया याने फोन करुन कळविले की, तुझा भाऊ मड्ड्या याला मृगनयनीजवळ मारहाण सुरू आहे. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी तू लवकर ये. हे कळताच अनिकेत धावतच घटनास्थळी पोहोचला. तेव्हा हॉटेल जयभवानीसमोर अजय प्रधान, नामदेव प्रधान, सचिन उर्फ गोट्या प्रधान, अतीश काळे, त्याचा मेव्हणा दर्शन चौधरी आणि अन्य तिघे मड्ड्याला लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करत होते. त्याचवेळी अजय प्रधानने अनिकेत समोरच मड्ड्याच्या डोक्यात भला मोठा दगड घातला. यादरम्यान अनिकेत भांडण सोडविण्यासाठी धावला असता मारेकरी तेथून पसार झाले.
दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे सहाय्यक फौजदार खय्यूम पठाण , पोलिस नायक प्रकाश गायकवाड , अविनाश ढगे, पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित , सहाय्यक फौजदार राठोड , नायक नवाब शेख , पोलीस शिपाई दीपक मतलबी, विक्रम वाघ यांची दोन पथके तयार केली. सदर पथक आरोपींचा शोध घेत असताना पोलिस नायक प्रकाश गायकवाड यांना गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्या पाटोदा गावातील पाहुण्यांकडे असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ पाटोदा गाव येथे जाऊन तेरे चौकात गुन्ह्यातील मुख्य आरोपी १) सचिन सोमनाथ प्रधान, वय 29 , राहणार वडगाव कोल्हाटी औरंगाबाद २) अजय सोमनाथ प्रधान वय 23 आणि ३) सतीश लक्ष्मण काळे वय 34 हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक पोद्दार यांच्या समक्ष हजर केले.