AurangabadNewsUpdate : रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराचा खून, पोलिस पथके आरोपीच्या मागावर

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेकाॅर्डवरचा गुन्हेगार विलास फाटे उर्फ मड्ड्याचा हल्लेखोरांनी काल रात्री ९.३०च्या सुमारास डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ यांनी दिली.
मयत कुख्यात मड्ड्या हा २/३महिन्यांपूर्वी जामिनावर सुटुन आला होता. वाळूज परिसरातील प्रधान गँग ने हा खून केल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला. हाॅटेल मृगनयनी परिसरात ही घटना घडली.या संदर्भातले सी.सी.टि.व्ही.फुटेज हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सराफ यांनी दिली.वाळूज औद्योगिक पोलिसांची दोन पथके आरोपींना अटक करण्यासाठी रवाना झाली आहेत. घटनास्थळी पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता, पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी भेट दिली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गौतम वावळे पोलिस कर्मचारी नवाब शेख करंत आहेत.
२७ वर्षीय मृत विशाल उर्फ मड्ड्या किशोर फाटे हा वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी असून तो स्वतःला वाळूजचा स्वयंघोषित डॉन समजत असायचा. नेहमी नशेत राहणारा विशाल स्वतःजवळ सतत चाकू बाळगायचा. त्याने दोन दिवसांपूर्वी वाळूज येथील एका मासे विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवत फुकटात मासे नेले होते. याप्रकरणी मासे विक्रेत्याने गुन्हा दाखल केला नाही. त्याचबरोबर 2012 साली दुचाकी जळीतकांडातही मुख्य सूत्रधार म्हणून विशालला अटक करण्यात आली होती . त्याच्याविरोधात मारहाण, लूटमार, खून असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो ज्या परिसरात वास्तव्याला होता, तेथील नागरिकही त्याच्या त्रासाला कंटाळले होते.
याव्यतिरिक्त, स्वयंघोषित डॉन मृत विशालने अन्य तिघांच्या मदतीने १७ मे २०२० रोजी दुपारी वडगाव कोल्हाटी येथील योगेश प्रधान नावाच्या एका युवकाची डोक्यात दगड घालून आणि शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली होती. अगदी याच पद्धतीने विशालचीही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे विशालची हत्या बदलेच्या भावनेतून झाली असावी, असा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री साडेनऊ , दहाच्या सुमारास काही तरुण एका तरुणाला बेदम मारत असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या बाजूला रक्ताने माखलेले दोन दगड देखील होते. पोलिसांनी जखमी विशाल फाटेला घाटी येथील रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीचं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.