AurangabadNewsUpdate : ३५ हजाराला रेमडेसिवीर विकणारे लॅब कर्मचारी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग शहरात ओसरत असला तरी, रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी होत आहे. पुंडलिकनगर भागात ३५ हजाराला एक रेमडेसिवीर इंजेक्शन विकण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संदीप अप्पासाहेब चवळी, वय २५, रा. भाग्योदयनगर सातारा परिसर, गोपाल हिरालाल गांगवे, वय १९, रा. सातारा परिसर अशी दोघांची नावे आहे. दोघेही पॅथलॉजी लॅबमध्ये काम करतात.
विशेष म्हणजे ते शहरात परभणीतून इंजेक्शन आणत होते. त्यांच्या कडून चार इंजेक्शन जप्त करण्यात आले असून त्यातील एक सरकारी रुग्णालयातले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गोकुळ स्वीट जवळ दोन दुचाकीस्वार काळ्याबाजारातील रेमडेसिवीर इंजेक्शन ३५ हजार रुपयात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती, गुन्हे शाखेचे सपोनि मनोज शिंदे यांना मिळाली. त्यांनी कर्मचाऱ्यांना माहितीची शाहनिशा करण्यासाठी पाठवले. या माहितीची खात्री मिळताच ते पथकासोबत रवाना झाले. त्यांनी एन ४ येथील एसबीआय बँकेजवळ सापळा लावला.
काही वेळात तेथे चवळी आणि गांगवे हे दुचाकीवर आले. त्यांच्या जवळ जावून शिंदे यांनी विचारपूस करत त्यांची झडती घेतली. त्यात शिंदे यांना दोघांकडून प्रत्येकी एक रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले. त्यानंतर दोघांना शिंदे यांनी ताब्यात घेतले. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनबद्दल विचारणा केली. सुरुवातीला दोघांनी उडवा उडवीची उत्तर दिली. दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन परभणी मध्ये राहणाऱ्या शेळके नावाच्या माणसाकडून आणले. तसेच दोन इंजेक्शन काम करत असलेल्या लॅबमध्ये ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ लॅबमध्ये जावून ते दोन इंजेक्शन जप्त केले. विशेष म्हणजे हे दोघे लॅबच्या कामानिमित्त सतत परभणीला जात होते.