IndiaNewsUpdate : कोरोनाच्या निमित्ताने लूट , २५ किलोमीटरसाठी रुग्णवाहिका चालकाने आकारले 42 हजार रुपये !!

नवी दिल्ली : एकीकडे लोक कोरोनाच्या महामारीने त्रस्त असून औषधोपचाराच्या नावाखाली लाखो रुपयांची लज्जास्पद लूट चालू आहे . मृताच्या अंगावरचे दागिने काढून घेणे , खिशातील पैसे काढून घेणे , कोरोनावरील औषधी , इंजेक्शन अव्वाच्या सव्वा दराने विक्री करणे असे प्रकार उघडकीस येत आहेत . अशाच प्रकारची एक घटना नोएडामध्ये घडली असल्याचे वृत्त आहे.
नोएडायेथे एका कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने 42 हजार रुपये आकारले. रुग्णाच्या कुटुंबाकडे दुसरा पर्याय नव्हता. अवघ्या 25 किलोमीटर लांब असलेल्या रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने एका किलोमीटरमागे 3500 रुपये आकारण्यात आले. मात्र पोलिसांनी आपला हिसका दाखवताच रुग्णवाहिका चालकाने रुग्णाच्या नातेवाईकांना ४० हजार परत केले.
दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांनी आपल्या स्तरावर कारवाई केली व चालकापर्यंत पोहोचले. पोलिसांनी नंबर ट्रेस करीत चालकाला ताब्यात घेतले. चालकाने आपली चूक मान्य केली आणि उर्वरित रक्कम रुग्णाच्या नातेवाईकांकडे सोपवली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या चौकशीदरम्यान रुग्णवाहिका चालकाने सांगितले की, तो रुग्णाना अनेक रुग्णालयांमध्ये घेऊन गेला आणि त्याला पूर्ण मदत केली. मात्र 25 किलोमीटरसाठी 42 हजार रुपये आकारणे चुकीचेच होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णाच्या कुटुंबीयांना 40 हजार रुपये परत केले.