CoronaIndiaUpdate : धक्कादायक : बंगळुरू शहरात स्मशानभूमीत लागल्या रांगा

बेळगाव : कर्नाटक राज्यात कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून बंगळुरू शहरात गेल्या चार दिवसांमध्ये पन्नास हजारांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असल्याने स्मशानभूमी समोर अक्षरक्ष: रुग्णवाहिकेच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी तब्बल वीस-वीस तासांचा कालावधी लागत आहे. हि परिस्थिती लक्षात घेता कालच कर्नाटक राज्य सरकारने नाईट कर्फ्यु लागू केला आहे, तर महाराष्ट्र आणि गोव्याची सीमाही सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक राज्यातही कडकडीत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.
याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बंगळुर शहरातल्या अनेक स्मशानभूमींसमोर शेकडो रुग्णवाहिका सध्या थांबून आहेत आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी तत्काळ याची दखल घेत निर्बंध लागू करण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे आजच येडियुरप्पा यांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या आठवड्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते.
दरम्यान बंगळुरू शहरातल्या अनेक स्मशानभूमीसमोर कोरोनामुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यांचे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. मात्र रुग्णांची संख्या इतकी आहे की लवकर अंत्यसंस्कार होऊ शकत नाहीत. अपुरी यंत्रणा असल्यामुळे अंत्यसंस्कार करायला वेळ लागत आहे. त्यामुळेच अनेक स्मशानभूमीसमोर रुग्णवाहिकेच्या रांगा लागल्या आहेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बेळगाव शहरातही याचे पडसाद उमटले. बेळगावमध्ये दुपारी दोनच्या दरम्यान अचानक पोलीस रस्त्यावर उतरले आणि दुकाने बंद करण्यास करण्यास सांगितले. त्यामुळे व्यापारीही काही काळ संभ्रमात सापडले होते.