MaharashtraCoronaUpdate : चिंताजनक : एका तासात दोन हजारांहून अधिक जणांना करोनाची लागण, राज्य लॉकडाऊनच्या वाटेवर

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले असले तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. रविवारी ६८ हजार ६३१ नवीन करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. कर, राज्यात काल ५०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही एका दिवसातील राज्यातील सर्वात मोठी आकडेवारी आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात दर ३ मिनिटाला एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होत असून एका तासात दोन हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण होत असल्याने लॉकडाऊन पर्याय नसल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील कठोर निर्बंध हटवून राज्य सरकार पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याच्या विचारात असून त्याशिवाय पर्याय नसल्याने कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य आहे. करोनाच्या या दुसऱ्या लाटेत ग्रोथ रेटही वाढत आहे. मुंबईत कोरोनाचा ग्रोथ रेट वाढून १. ५३ टक्के इतका झाला आहे. प्रारंभी राज्यातील अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसेच इतर लहान दुकाने असणारेही लॉकडाउन १०० टक्के करा अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे.
केंद्राकडून निधी अपेक्षित
राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसांत यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून कशा पद्धतीने अमलबजावणी होणार आहे याची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान कोरोनाच्या लढाईसाठी सरकारने साडे पाच हजार कोटी रुपये राखीव ठेवले असल्याची माहिती दिली. केंद्र सरकारने एसडीआरएफमध्ये कोविडसाठी पैसे दिलेले नाहीत. गेल्यावेळी १२०० कोटी रुपये दिले होते. मागच्या वेळी ३ एप्रिलला पैसे आले होते, पण आज १९ एप्रिल असून अद्यापही पैसे आलेले नाहीत. हे टीका म्हणून नाही, पण उशीर झाला आहे. यावर्षी त्यांच्याकडून १६०० कोटी अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.