MaharashtraNewsUpdate : अरे रे हे काय झाले ? अनेक रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टर पिता-पुत्राचाही कोरोनाने घेतला बळी !!

कल्याण : कल्याणमध्ये अनेक रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टर पिता -पुत्राचाच कोरोनामुळं अंत झाला असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे एकापाठोपाठ काही तासांच्या अंतरानेच या डॉक्टर पितापुत्रांचा मृत्यू झाला. डॉ. नागेंद्र मिश्रा आणि त्यांचा मुलगा डॉ. सूरज मिश्रा असे या दोघांचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. नागेंद्र मिश्रा यांचे टिटवाळामधील खडवली परिसरात सुमारे 22 वर्षांपासून क्लिनिक आहे. त्यांनी या माध्यमातून दोन दशकांहून अधिक काळ रुग्णसेवा केली आहे. नागेंद्र मिश्रा यांच्याप्रमाणेच त्यांचा आदर्श घेऊन त्यांचा मुलगा सूरज मिश्रा यानेही रुग्णसेवेचा वसा घेतला होता. भिवंडीच्या बापगाव भागात त्यांचे क्लिनिक होते. कोरोना काळात या दोघंही पिता पुत्रांनी अनेक प्रकारे लोकांना मदत केली.
दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांना ताप येऊ लागला. तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले . मात्र नियतीचा खेळ म्हणजे अनेकांना कोरोनाच्या विळख्यातून सोडवणाऱ्या या देवदुतांनाच बेडसाठी वणवण करावी लागली. कल्याण डोंबिवलीत बेड मिळाला नाही म्हणून नागेंद्र यांना ठाण्यात वेदांत रुग्णालय आणि सूरज यांना गोरेगावमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात डॉ . नागेंद्र यांच्या पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. त्यांना वसई विरारमधील रुग्णलयात दाखल करण्यात आले. तर मोठा मुलगा आणि त्यांच्या पत्नी घरीच क्वारंटाईन होते. या दरम्यान डॉक्टर नागेंद्र आणि सूरज यांची प्रकृती खालावत गेली त्यामुळे बुधवारी 15 एप्रिलला रात्री सूरज यांचं निधन झालं. तर नंतर काही तासांतच पहाटेच्या सुमारास डॉक्टर नागेंद्र यांनीही अखेरचा श्वास घेतला. एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
यातही आणखी वाईट बाब म्हणजे नागेंद्र यांचे ज्या दिवशी निधन झाले त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता. तर नोव्हेंबर महिन्यातच सूरज यांचे लग्न झाले होते. त्यामुळं या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. नागेंद्र यांनी कोरोनाची लसही घेतली होती. पण दुसरा डोस घेण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकारानंतर संपूर्ण कल्याण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत.