MaharashtraNewsUpdate : कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे ? भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर खवळले अजित पवार …

“कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे ? मास्क लावण्याची गरज नाही”
सांगली : भाजपच्या वतीने लॉकडाऊनच्या विरोधात सांगलीमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला होता. भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यासह विविध व्यापारी संघटनाही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी केलेली वक्तव्ये राज्यभरात चर्चेचा विषय झाली आहेत.
नक्की काय म्हणाले संभाजी भिडे?
१ . अस्तित्वात नसलेले काळे मांजर काळ्या कूट अंधारात शोधण्यासारखा कोरोना रोगाचा प्रकार
२. कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे, प्रत्येकाच्या जीवाची काळजी जो तो घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये
३. कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा, कोरोना- कोरोना आक्रोश चालला आहे… पण कोरोना अस्तित्वात नाही, लॉकडाऊनची गरज नाही.
४. केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार…जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील
५. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे, नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील.
६. कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे ? मास्क लावण्याची गरज नाही
दरम्यान मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलेल्या कोरोनासंदर्भातील वक्तव्यावरून चांगलाच वाद उफाळून आला असून संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका केली जात आहे. या वक्तव्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारावाईचे संकेत दिले आहेत. ‘मनोहर भिडेंचं वक्तव्य तपासून कारवाईचा निर्णय घेणार’ असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
भिडे यांनी सांगलीमध्ये लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना त्यांनी काही अजब विधाने केली आहेत. ‘कोरोना हा मुळी रोगच नाही. कोरोनामुळं मृत्यू होणारी माणसं जगण्याच्या लायकीचीच नाहीत’, असे वक्तव्य मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केले आहे. एवढ्यावरच न थांबता ‘मास्क लावण्याचा सिद्धांत कोणत्या शहाण्याने काढला, मास्क लावण्याची वगैरे काहीही गरज नाही’, असे धक्कादायक विधान देखील भिडे यांनी केले . प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे तो काळजी घेतो असे भिडे यांनी म्हटले . लॉकडाऊन विरोधात लोकांनी बंड करायला हवे आणि अशा नियम करणाऱ्या शासनाला फेकून द्यायला पाहिजे असे ही भिडे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे भाजप कडून काढलेल्या मोर्चात त्यांनी हि मुक्ताफळे उधळली आहेत.
भिडे यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. ‘या माणसाने आधी बागेतल्या आंब्याबद्दल वक्तव्य केले होते . त्यात आता केलेले वक्तव्य म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धीचा प्रकार’असल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे. नेमके वक्तव्य तपासून या प्रकरणी कारवाई करणार असल्याचे अजित पवार यांनी पंढरपुरात बोलताना म्हटले आहे.