AurangabadCrimeUpdate : नगरच्या तरुणाचा औरंगाबादेत खून

औरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाची स्मशानात नेऊन निर्घृणपणे हत्या ( करण्यात आली आहे. ही घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास समोर आली असून आजच या तरुणाची परीक्षा होती. विकास देवीचंद चव्हाण वय-23 (रा.पाथर्डी, जि. अहेमदनगर) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, औरंगाबाद चिकलठाणा परिसरात असलेल्या एका संस्थेमध्ये विकास याचं परीक्षा केंद्र होतं. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास रिझर्व बँकेची परीक्षा असल्या कारणाने तो पाथर्डी येथून पैठणमार्गे रात्री औरंगाबादला एसटीने दाखल झाला होता. मात्र आज सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीत रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.
ही माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक आयुक्त हनुमंत भापकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेह संपूर्ण रक्ताने माखलेला होता. तर मृतदेहाला एक हातच नव्हता. तरुणाच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या.
हा तरुण येथे कसा आला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके कामाला लावली होती. त्याच दरम्यान स्मशानभूमीची पाहणी केली असता प्रवेशद्वारावर एक बॅग आढळून आली. त्या जागेवर देखील रक्ताचे डाग फॉरेन्सिक टीमलाआढळून आले. ती बॅग उघडून पाहणी केली असता बॅगेत हॉल तिकीट, फोटो, ओळख पत्र अशी कागदपत्रे पोलिसांना मिळाली. त्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी तरुणाची ओळख पटवली आहे.या प्रकरण सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.