IndiaNewsUpdate : केंद्राचा पुन्हा एक घोळ , नवा वेज कोड लांबणीवर !!

नवी दिल्ली : व्याज दर कपाती बरोबर केंद्र सरकारचा आणखी एक घोळ उघडकीस आला आहे . तो म्हणजे आज एक एप्रिल 2021 पासून लागू होणारा नवा वेज कोड तुर्तास लागू करण्यात येणार नाही. कामगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नव्या वेज कोडला काही काळापुरते लांबणीवर टाकण्यात आले आहे. परिणामी एक एप्रिल 2021 पासून कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होणार नाही. त्यामुळे आता टेक-होम सॅलरी मध्ये देखील कपात होणार नसल्याचे वृत्त आहे.
याबाबत ईपीएफओ बोर्डाचे सदस्य विर्जेश उपाध्याय यांनी सांगितले की, सरकारकडून जोपर्यंत नवे नोटिफिकेशन जारी होत नाही, तोपर्यंत नव्या निर्णयाची अंमलबाजवणी होत नाही. 1 एप्रिलपासून नवी वेतन नियमावली लागू होणे कठीण आहे. मागील काही दिवसांपासून वेज कोड चर्चेत आहे. हा नवीन कोड एक एप्रिलपासून लागू होणार होता. तज्ञांच्या मतानुसार या वेज कोडमध्ये काही त्रुटी असल्याने याला लागू करण्यात अडचणी आहेत.
नवीन वेज कोड आहे तरी काय ?
वेज कोड अॅक्ट 2019 नुसार कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार म्हणजेच कॉस्ट टू कंपनीच्या (CTC) 50 टक्के रक्कम बेसिक आणि 50 टक्के भत्ता अशा रुपात द्यावी लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराची 50 टक्के रक्कम आधीच बेसिक आहे त्यांच्यावर या नव्या नियमांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्यांची बेसिक सॅलरी एकूण रकमेच्या 30 ते 40 टक्के आहे, त्यांच्या हातात येणाऱ्या पगारात मात्र कपात होईल.
दरम्यान वेज कोड अॅक्ट 2019 लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे सॅलरी स्ट्रक्चर पूर्णपणे बदलणार आहे. कर्मचाऱ्यांचा हातात येणारा पगार कमी होईल. कारण बेसिक पे वाढल्यामुळे त्यांचा पीएफ जास्त कट होणार आहे. तसेच पीएफसोबत ग्रॅच्युएटी सुद्धा वाढणार आहे.