NashikNewsUpdate : नाशिक शहरात आता बाजारात जाण्यासाठी सशुल्क परवानगी

नाशिक शहरात गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना
– मुख्य बाजारपेठेत जाणारे रस्ते बंद. । बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास पाच रुपये प्रतिव्यक्ती आकारले जातील.
– एक तासापेक्षा जास्त वेळ बाजारपेठेत थांबल्यास पाचशे रुपये दंड. । महापालिका आणि पोलीस संयुक्त कारवाई करणार.
– नियम मोडल्यास मुंबई पोलीस कायदा ४३ अन्वये कारवाई करणार.
– बाजारपेठेतील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना भद्रकाली पोलीस स्टेशनकडून पास दिले जाणार. पासधारकांनाच असेल प्रवेश.
– मेनरोड, सिटी सेंटर मॉल, पंचवटी बाजार समितीमध्ये हा निर्णय लागू.
– सकाळी ८ ते रात्री ८ पोलीस तैनात असणार. ८ नंतर कुणालाही परवानगी नाही.
नाशिक : नाशिकमध्ये करोनाचा उद्रेक झाला असून या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले टाकायला सुरुवात केली असून आता बाजारपेठेत जायचे असेल तर आता अनेक कठोर नियमांचे अडथळे आधी पार करावे लागणार आहेत. त्यासोबत व्यापारी आणि फेरीवाल्यांनाही वचक बसावा म्हणून पावले टाकण्यात आली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात करोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला आहे. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी नाशिक महापालिका क्षेत्रात तब्बल २ हजार ४०३ नवीन रुग्णांची भर पडली तर उर्वरित नाशिक जिल्ह्यात १ हजार १५९ नवे रुग्ण आढळले. नाशिक जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढून २६ हजार ५३८ इतकी झाली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी नाशिक शहरात थेट रस्त्यावर उतरून गर्दीच्या ठिकाणांना भेट दिली होती व नियमांचे पालन करण्यासाठी विनंती केली होती.
दरम्यान नियम पाळले गेले नाही तर लॉकडऊन हा एकमेव पर्याय उरेल, असे ते म्हणाले होते. नाशिककरांना ८ दिवसांची मुदत देतानाच २ एप्रिल रोजी बैठक घेऊन लॉकडाऊनबाबात निर्णय घेतला जाणार असेही त्यांनी नमूद केले होते. भुजबळ यांच्या या इशाऱ्यानंतर नाशिक महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे शिस्तीचा बडगा उगारला असून त्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे.